पंचायत समिती सभेत अधिकाऱ्यांना सूचना
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे एसटी महामंडळाने बंद केलेल्या बसफेऱ्या सुरू करण्यासाठी अजूनही स्वारस्य दाखवलेले नाही. येत्या दोन दिवसांत रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी च्या बसफेऱ्या तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत करण्यात आली आहे.
रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरूवारी सभापती सौ. संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत कोरोनामुळे लॉकडाउन काळात एसटी बसच्या गावागावातील फेऱ्या बंद करण्यात आल्या. अजूनही या बंद केलेल्या बसफेऱ्या अनेक भागात सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाकडून कार्यवाही करण्यात आली नसल्याचे ज्येष्ठ सदस्य गजानन पाटील यांनी सभागृहात सांगितले. ग्रामीण भागात अनेक बसफेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अलिकडे कोरोनाचा पभाव कमी होताच निवडक बसफेऱ्या अनेक मार्गावर सुरू करण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सवात तर चाकरमान्यांच्या दिमतीला एसटी महामंडळ जोमाने जादा बसफेऱ्या सुरू करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र येथील ग्रामीण भागातील जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार या महामंडळाकडून आजही झालेला नाही.
ग्रामीण भागातून अनेक ग्रामस्थ आपल्या नियमित तसेच महत्वाच्या कामांनिमित्त ये-जा करत असतात. मात्र बसफेऱ्या बंद असल्याने त्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होताना दिसते. आरे-वारे किंवा तालुक्यातील अन्य भागातही बंद बसफेऱ्यामुळे लोकांची मोठी अडवणूक होत असल्याचे सदस्य गजानन पाटील यांनी सांगितले. त्याबद्दल एसटी महामंडळाच्या कारभाराकडे त्यांनी लक्ष वेधले. येत्या दोन दिवसांत बंद असलेल्या एसटी च्या बसफेऱ्या सुरू केल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली. त्याला या सभेत उपस्थित सदस्यांनीही पाठींबा दिला.
शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. पण त्या भरपाईसाठी शासनाकडून नेमलेल्या विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याची बाब माजी उपसभापती दिपक नावले यांनी सभेत मांडली. शेतकऱयांच्या बागायतींमध्ये वातावरणातील तापमानाची नोंद करण्यासाठी तापमापक बसविण्यात येते. तापमापकाच्या तापमानाच्या नोंदीनुसार विमा रक्कमेच्या हप्त्यांची आकारणी होत असते. पण बसवली जाणारी तापमापके सड्यांवरील जास्त झळा बसणाऱया बागायतींपरिसरात न बसवता ती खोलगट भागातील बागायतींमध्ये बसवली जातात. त्यामुळे नुकसान जास्त होणाऱ्या भागातील तापमानाची नोंद होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची या गोष्टीसाठी दखल घेण्यात यावी, असे सांगितले.