तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत ठाकरे गटाची सरशी

रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत ठाकरे गटाने शिंदे गटाला धूळ चारत सरशी मिळवली. पालकमंत्री उदय सामंत यांनी वयक्तिक लक्ष टाकल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला धोबीपछाड दिल्याची चर्चा जोरात रंगली आहे. दरम्यान निवडून आलेल्या पॅनलचे पदाधिकारी हे पक्ष विरहित असून सर्वपक्षीय पॅनल या निवडणुकीत विजयी झाल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हा व तालुका हौशी कबड्डी असोसिएशनची पंचवार्षिक निवडून रविवार 4 जून रोजी शहरातील दामले शाळा येथे पार पडली.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पाठिंब्यावर रोहित मयेकर यांनी रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. अतिशय अटीतटी च्या या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने बाजी मारली.

निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वैभव विठोबा पाटील २८ मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या विरोधात असलेल्या बाबा शैलेश मयेकर यांना 23 मते पडली. कार्याध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सागर कळंबटे 29 मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या विरोधातील अभिषेक दिलीप पाटील यांना 22 मते मिळाली. कार्यवाहक पदावर
अरुण नथुराम पवार 28 मते घेऊन विजयी झाले तर पराभूत सिद्धेश जठार यांनी 23 मते घेतली. खजिनदार पदावर गुरुदास मनोहर खुळे 28 मते घेत विजयी ठरले. उपाध्यक्ष पदावर अजिंक्य राजेंद्र धुंदुर 28 मते तर राजाराम सुरेश नाटेकर 27 मते हे दोघे विजयी ठरले. सहकार्यवाहक पदावर संदेश धर्माजी तोडणकर (विजयी) 29 मते आणि प्रसाद सुरेंद्र वाडकर (विजयी ) 27 मते घेत विजयी ठरले.

निवडणुकीत ठाकरे गटाने सरशी मारल्याने शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकालानंतर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवून पक्षातील काहींनी दगाफटका केल्याचे म्हटले आहे.