रत्नागिरी:- कोकणातील चार जिल्ह्यात करण्यात येणारी हजाराहून अधिक तलाठ्यांची नियोजित पदभरती तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही पदे भरण्यासाठी आदिवासी जिल्ह्यांतील पैसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी शासनाने मार्गदर्शन मागविल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याने ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते.
ज्या जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त आहे. या जिल्ह्यांत पैसा क्षेत्रातील बिंदू नामावलीनुसार पदभरतीबाबत चर्चा सुरू आहे.याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. बिंदु नामावलीमध्ये काही दुरुस्त्या आहेत किंवा कसे, बिंदू नामावलीप्रमाणे रिक्त पदे किती आहेत. या रिक्तपदांमध्येही आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती आणि कसे आहे.
याबाबत विभागीय आयुक्तालयाकडे निर्णय प्रलंबित आहे. हा निर्णय तसेच मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर आदिवासी व बिगर आदिवासी यांची पदे अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतरच तलाठी पदभरतीबाबत अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या परीक्षेसाठी तयारी करणार्यांचा परीक्षा लांबणीवर पडल्याने हिरमोड झाला आहे.