जागा वाटपाचा अंतिम निर्णय दोन दिवसात: ना.उदय सामंत
रत्नागिरी:- रत्नागिरी-लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचाच आहे. त्यामुळे आम्ही या मतदार संघावर दावा केला आहे. आमचा दावा अद्याप कायम आहे. तीन्ही पक्षाच्या नेत्यांशी मी चर्चा केली आहे. तीनही नेते एकत्र चर्चा करुन येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेतील. भाजपातर्फे मंत्री ना.नारायणराव राणे यांनी उमेदवारी अर्ज घेतले असतील तर आम्हीही उद्या उमेदवार अर्ज घेणार असल्याचे शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी रविवारी सांगितले. रत्नागिरीत ते पत्रकारांशी बोलत होते.
रत्नागिरी-लोकसभा मतदार संघतील महायुतीच्या उमेदवारीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणेच उमेदवार असतील असा दावा भाजपातर्फे केला जात आहे. तर रत्नागिरी-लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ असल्याने तो आम्हालाच मिळावा असा दावा शिवसेना नेते ना.उदय सामंत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ना.उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी-लोकसभा मतदार संघाबाबात कोणताच तिढा नाही. महायुतीचे नेते निर्णय घेताना एकत्रित चर्चा करुन निर्णय घेत असतात. मी तीनही नेत्यांसमवेत चर्चा केली आहे. तीनही पक्षाचे नेते पुन्हा चर्चा करुन रत्नागिरी-लोकसभा मतदार संघाच्या जागेबाबात निर्णय घेतील.
लोकसभा निवडणूक लाढविण्यासाठी शिवसेनेमार्फत माझे मोठे बंधू किरण सामंत इच्छूक आहेत. तसे मी पक्षाला सांगितले आहे. भाजपाच्या नेत्यांनीही या जागेवर दावा केला आहे. पक्ष वाढवत असताना कोणत्याही जागेवर दावा करणे चूकीचे नाही. मात्र हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ आहे. येथे आता शिवसेनेचे खासदार आहेत. ते आमच्या सोबत आले नाहीत. मात्र जागा शिवसेनेची असल्याने ती आम्हलाच मिळावी असे आमचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजित पवार एकत्रित बसून निर्णय घेतील. हि जागा महायुतीत आम्हलाच मिळेल असा विश्वास असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी-लोकसभा मतदार संघातून भाजपातर्फे ना.नारायणराव राणे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याबद्दल ना.सामंत म्हणाले. उमेदवारी अर्ज घेण्यात गैर काहिही नाही. त्यांनी अर्ज घेतले असतील तर आम्हीही उद्या अर्ज घेवू. त्यांच्या बैठका सुरु झाल्या असल्या तरी आमचाही प्रचार सुरु आहे. आम्ही सभा घेत नाही. थेट जनतेशी संवाद साधत आहोत. आमचे कार्यकर्ते केव्हाच कामाला लागले आहेत. त्यामुळे आम्ही प्रचारात कुठेही मागे नसल्याचे ना.सामंत म्हणाले.