दापोली:- मी बँक ऑफ बडोदा शाखा बांद्रा-कुर्ला शाखेमधून बोलतोय असे सांगून तरुणीची २९ हजार ९९६ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक शर्मा नामक तोतयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दापोली येथील प्रियांका अरूण भुवड (वय २३, रा. आझादवाडी, गिम्हवणे) हिच्या मोबाईलवर दीपक शर्मा बँक ऑफ बडोदा शाखा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, केवायसी ऑफिस या नावाने कॉल व एसएमएस केले होते.
मुंबईतून बँकेचे वरिष्ठ अधिकारी बोलतायत असे समजून त्या भामट्याने विचारलेली माहिती भुवड यांनी दिली. भुवड यांच्या बँक खात्याची माहिती करून घेत त्यांच्या खात्यातील २९ हजार ९९६ रूपये लंपास केले. खात्यातून पैसे गेल्यानंतर आपली फसवणूक झाली हे भुवड यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी प्रियांका अरुण भुवड यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक शर्मानामक भामट्याविरोधात भादंविक ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ क, ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.