खेड:- दारूच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावात कॉलेज वरून घरी जाणाऱ्या तरुणीची छेडछाड करणाऱ्या ट्र्क चालकाच्या मंगळवारी रात्री अखेर खेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून तरुणीची छेड काढून जंगलात पळत असताना दारूच्या नशेत पडून गंभीर जखमी झालेल्या त्या ट्रक चालकावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून रुग्णालयात पोलिसांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी कॉलेज वरून घरी महामार्गावरून चालत जाणाऱ्या तरुणीला ट्र्क चालंकाने ट्रक महामार्गावर थांबवून त्या तरुणीची छेड काढली यामध्ये त्या तरुणीच्या मानेला त्याचे नख लागल्याने तिला किरकोळ इजा देखील झाली. त्या तरुणीने आरडा ओरडा केल्यानंतर हा ट्रक चालक जंगलाच्या दिशेने पळाला. ही घटना घडल्यानंतर वेरळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
ही बातमी वाऱ्यासारखी खेड सह जिल्हाभरात पसरल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तात्काळ खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याशी संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जंगलात पळालेल्या ट्रक चालकाचा तपास सुरु झाला.
पोलिसांना कळल्यानंतर अवघ्या एक ते दीड तासात जंगलातून बाहेर पडलेल्या त्या ट्रक चालकाला गावातील काही लोकांनी पहिले आणि खेड पोलिसांच्या पथकाने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला ताब्यात घेतले. हा ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
तरुणीची छेड काढल्यानंतर जंगलात पळत असताना पडून त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला पोलिसांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर पोलिसांच्या निगराणीखाली कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.