रत्नागिरी:- शहरालगतच्या नॅनो सिटी येथील तरूणावर चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या संशयितांची न्यायालयाने ५० हजार जातमुचलक्यावर मुक्तता केली. विनायक सुरेश हेगडे (२०, रा. सांगली-मिरज, सध्या रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करत अटक करण्यात केली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, नॅनो सिटी येथे राहणारा तरूण व विनायक हेगडे हे दोघेही एकमेकांचे मित्र असून ते मच्छीमारीचा व्यवसाय एकत्र करत होते. विनायक हा नॅनो सिटी येथील तरूणाच्या घरीच वास्तव्य करत होता. याच काळात विनायकचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय संबंधित तरूणाला आला. यातून दोघात वाद निर्माण झाल्याने विनायक हा दुसरीकडे वास्तव्यासाठी गेला होता. संबंधित तरूणाची पत्नी ही ११ एप्रिल २०२३ रोजी आपल्या ओळखीतील महिलेच्या घरी जात असताना रस्त्यात तिची विनायक हेगडे याच्याशी भेट होते. यावेळी ती विनायकला आपल्या ओळखीतील महिलेच्या घरी घेवून जाते. आपली पत्नी विनायकसोबत एका घरात असल्याची कुणकुण लागताच संबंधित तरुणाच्या रागाचा पारा चढतो. पत्नी व विनायक असलेल्या घरामध्ये शिरून संबंधित तरूण हा विनायकला मारहाण करण्यास सुरूवात करतो. यावेळी विनायक हा आपल्याकडील चाकूने संबंधित तरूणाच्या शरीरावर सपासप वार करतो. चाकूच्या वारने रक्ताच्या चिळकांड्या उडतात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संबंधित तरूणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते, अशी तक्रार तरुणाच्या पत्नीने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांकडून विनायकविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात येते. आपल्याला जामीन मिळावा यासाठी विनायककडून न्यायालयापुढे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबालकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. आरोपीचे वय व गुन्ह्याचा तपास पूर्ण होवून दोषारोपपत्र न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे सादर करण्यात आले आहे हे लक्षात घेता आरोपीची ५० हजारच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात येत असल्याचा निकाल न्यायालयाने दिला.