रत्नागिरी:- तरुणाला वारंवार फोन करून धमकी देत पैशांची मागणी करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, ८ ऑगस्ट ते सोमवार, १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हातखंबा तिठा, कोर्ट आणि उद्यमनगर या तीन ठिकाणी घडली आहे.
सोहम मधुकर आंब्रे आणि आकाश मधुकर आंब्रे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अली फारूख सुर्वे (२६, रा. रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हे अली सुर्वेला वारंवार फोन करून धमक्या तसेच त्याची बदनामी करून ७० हजार रुपयांची मागणी करत होते. त्यांच्या धमक्यांना कंटाळून सुर्वेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.