रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावर तरवळ येथे भरधाव दुचाकीच्या झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. 24 जून रोजी हा अपघात झाला असून या अपघात प्रकरणी दुचाकीचालक तरुण कैलास मुंडेकर याच्या विरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास विष्णु मुंडेकर (वय २१, रा.मु.पो.भातगाव, देऊळवाडी, ता.गुहागर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर या अपघातात वृषाली रविंद्र आंबेकर (वय २२ , रा.फणसवळे, आंबेकरवाडी रत्नागिरी) या तरुणीचा मृत्यू झाला आहे.
कैलास मुंडेकर हा त्याचा भाऊ विशाल विष्णु मुंडेकर याच्या मालकीची महिंद्रा कपंनीची डयुरो स्कुटर (एम.एच ०८ / यु / ८२७९) घेऊन घराबाहेर पडला होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना तसेच सदर स्कुटरची पी.यु.सी व इश्युरन्स (विमा) नसताना देखील नव्हता. दुचाकी घेऊन तो फणसवळे करबुडेमार्गे निवळी ते जाकादेवी रोडने भातगाव येथे त्याची मैत्रिण वृषाली आंबेकर हिला घेऊन मौजे तरवळ येथील हॉटेल इंद्रधनुचे जवळ त्याचा गाडीवरील ताबा सुटला.
रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन स्कुटर हयगयीने व भरधाव वेगाने चालविल्याने त्याचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले. यावेळी त्याने वेगात असलेल्या स्कुटरचा ब्रेक अचानक दाबल्याने स्कूटरचे मागील चाक निखळून मोटार सायकलचा अपघात झाला. यावेळी डबलसीट बसलेली वृषाली रविंद्र आंबेकर ही रस्त्यावर पडून तिचे डोक्यास गंभीर दुखापत होवून तिचा मृत्यू झाला तर कैलास याला गंभीर दुखापत झाली. या अपघात प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.