रत्नागिरी:- नोंदणीकृत आणि प्रत्यक्षात परवाना घेतलेल्या मच्छीमारी नौकांच्या संख्येत तफावत आढळून आली होती. नोंदणी केल्यानंतर परवाना घेतलेल्या नौका किती याचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण मत्स्य विभागाकडून करण्यात आले. यामध्ये एक हजार नौका आढळून आल्या असून त्यांची नोंदणी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून रद्द करण्यात आली आहे.
मासेमारीला जाण्यापुर्वी मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून परवाना घेण्यापुर्वी नौकांना नोंदणी करावी लागते. अनेकवेळा नोंदणी केल्यानंतर पुढे परवाना घेतला जात नाही. दोन वर्षांपुर्वी शासनाच्या ही बाब लक्षात आली होती. रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर संपुर्ण किनारपट्टी भागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नोंदणी केलेल्या आणि प्रत्यक्ष परवाना घेतलेल्या नोंकांच्या संख्येत तफावत आढळून आली होती. त्यासाठी मत्स्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यांना अशा नौकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. एप्रिल 2019 पुर्वी नोंदल्या गेलेल्या आणि परवाना घेतलेल्या नौकांचे सर्व्हेक्षण केले गेले. यामध्ये एक हजार नौकांची तफावत आढळून आली. या नौका समुद्रात मासेमारी जात नाहीत. काही नौका किनार्यावर खराब होऊन बुडालेल्या अवस्थेत आहेत. काहींची कामे निघाली असून त्या बंदरातच पडून आहेत. नोंदणीनंतर एक वर्ष झालेल्या नोंकाची यादी निश्चित करण्यात आली. त्या नौकांना मत्स्य विभागाकडून मासेमारीसाठी परवाने दिले जाणार नाहीत. या नौका रेकॉर्डवरच नसल्यामुळे त्यांना शासनाकडून मिळणार्या परताव्याचे लाभही मिळू शकत नाहीत. परवाना न घेतलेल्या त्या बोटींची नोंदणी रद्द झाल्यामुळे सागरी सुरक्षेच्यादृृष्टीनेही हा महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. डिझेल कोटा घेण्यासाठी आवश्यक परवाने, विमा यासारखी कागदपत्रे लागतात. ती नोंदणी रद्द केलेल्या नौकांकडे नसल्यामुळे परताव्यामध्ये गडबड होण्याची शक्यता नाही, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.