रत्नागिरी:- गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री स्वर्गिय आर.आर.पाटील यांनी २००७ मध्ये सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजेना आता आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कागदावर सुरु असलेली हि योजना गेली पाच वर्ष पुर्णत: बंद आहे.
भाजपा काळात या योजनेची अंमलबजावणी थांबली होती. मात्र आर.आर.पाटील यांनी सुरु केलेल्या योजनेची अंमलबजावणी राष्ट्रवादीचा गृहमंत्री झाल्यावर होईल अशी अपेक्षा असतानाही विद्यमान सरकारमधील गृहमंत्र्यांनीही योजनेकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ८४७ पैकी ५३२ गावे तंटामुक्त झाली आहे. मात्र आता या योजनेची अंमलबजावणी न झाल्याने तंटामुक्त झालेली गावे पुन्हा ‘तंटायुक्त’होण्याची भिती निर्माण झाली आहे.स्वर्गिय आर. आर. पाटील गृहमंत्री असताना दि. १५ ऑगस्ट २००७ पासून ही योजना सुरू करण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या नावाने सुरू झालेल्या योजनेसाठी गावांना मोठ्या रकमेचे पुरस्कार ठेवण्यात आले. २०१५ पर्यंत राज्यातील १८ हजार ९९३ गावे तंटामुक्त झाली. तर १२९८ गावांना विशेष शांतता पुरस्कार मिळाले. या स्पर्धेसाठी २०० गुणांची चाचणी घेण्यात येत होती. त्यामध्ये तंटे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे आणि नवीन तंटे कमी करणे असे तीन प्रमुख निकष लावले जातात. यातून १५० गुण मिळविणारी गावे तंटामुक्त घोषित करून पुरस्कार मिळण्यासाठी पात्र ठरत होती. त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात पुरस्कार दिला जात होता. चाचणीत १९० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना विशेष शांतता पुरस्कार दिला जात होता. त्या गावाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा २५ टक्के अधिक रक्कम यासाठी दिली जाते. गावांनी ग्रामसभा घेऊन यामध्ये सहभागी झाल्याची घोषणा करायची असते. त्यानंतर स्वयंमूल्यांकन करून जिल्ह्याला प्रस्ताव द्यायचा. जिल्ह्याने अंतर्गत मूल्यमापन करून राज्याला पाठवायचा. त्यानंतर बाह्य मूल्यांकन केले जाऊन अंतिम निवड होते मात्र आता समित्यांची स्थापनाच होत नसल्याने प्रस्ताव पाठविणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सुरवातीची काही वर्षे ही मोहीम वेगाने सुरू होती. गावागावात तंटामुक्तीचे वातावण आणि पुरस्कार मिळविण्यासाठीची स्पर्धा सुरू होती. ग्रामस्थ आणि पोलिस अधिकारीही यामध्ये उत्साहाने सहभागी होत होते. त्यानंतर मात्र यातील उत्साह कमी होत गेला. अनेक गावांत केवळ कागदोपत्रीच कामकाज केले जाऊ लागले. पोलिसांना विचारणा होत असल्याने ते कशीबशी गावे तंटामुक्त झाल्याचे दाखवत असत.अलीकडे मात्र सर्वच पातळयांवर ही योजना मागे पडली आहे. सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे पोलीसांकडूनही या योजनेची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे गावांनीही समित्यांची स्थापना करणे टाळले आहे. सन २०१७ पासून जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त योजनेचीअंमलबजावणी ठप्प झाली आहे.योजना सुरु झाल्यापासूनच्या पुढील दहा वर्षात जिल्ह्यात ५३२ गावे तंटामुक्त झाली आहे. यातील रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव सारख्या गावाने सलग दहा वर्ष तंटामुक्त होण्याचा मान मिळवला होता. एनसी सारख्या तक्रारी गावातच सुटत असल्याने पोलीसांच्या कामावरील ताण कमी झाला होता. मात्र आता योजना बंद झाल्यापासून पुन्हा छोट्या तक्रारी पोलीस स्थानकातच जात असल्याने पोलीसांच्या कामावरील ताण वाढला आहे.