रत्नागिरी:- आमची सहनशक्ती आता संपली आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सरंजामशाहीचा बळी ठरू लागली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना कार्यभार न दिल्यास यवतमाळप्रमाणे रत्नागिरीतदेखील राजीनामासत्र सुरू होईल. जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन त्याला जबाबदार राहील, असा इशारा मॅग्मोचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉक्टर भगवान पितळे यांनी दिला आहे.
यवतमाळमध्ये जिल्हाधिकार्यांनी डॉक्टरांना दिलेल्या वागणुकीवरून तब्बल १२० डॉक्टरांनी राजीनामा देवून चक्क जिल्हाधिकार्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. त्याला राज्य मॅग्मो संघटनेनेदेखील पाठिंबा दर्शविला आहे. यवतमाळमध्ये डॉक्टरांचे आंदोलन सुरू असून यवतमाळप्रमाणेच रत्नागिरीतदेखील असेच प्रकार सुरू असल्याने रत्नागिरी जिल्हा मॅग्मो संघटनेची महत्वपूर्ण बैठक रत्नागिरीत पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मॅग्मोने आपली भूमिका स्पष्ट केली.गेले सात महिने कोरोनाच्या काळात अपुर्या कर्मचार्यांवर जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे. जिल्ह्यात केवळ ५ अधिकारी हे क्लासवन अधिकारी आहेत. मात्र फिजिशियनसह अन्य विभागातील डॉक्टरांची वानवा जाणवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात केवळ एक फिजिशियनयावेळी बोलताना डॉक्टर पितळे यांनी आरोग्य विभागाचा लेखाजोखाच मांडला. त्यात जिल्हा रूग्णालयाची अवस्था फार भयावह असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा रूग्णालयात कायमस्वरूपी फिजिशियन नाही. दापोलीतील फिजिशियनवर जिल्हा रूग्णालयाचे कामकाज चालू आहे. उसने फिजिशियन घेऊन हे कामकाज सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.राजकीय हस्तक्षेप होतोय. यवतमाळसह रत्नागिरी जिल्ह्यातदेखील डॉक्टर राजकीय बळी ठरू लागले आहेत. ही सरंजामशाही असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या राजकीय हस्तक्षेपामुळे दरदिवशी डॉक्टरांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा हस्तक्षेप थांबण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.हा लढा लॉबीविरोधातआमचा लढा डॉक्टरांवर होणार्या अन्यायाविरोधात आहे. सिव्हील सर्जनसह महिला आरोग्य अधिकार्यांना रात्री ११ वाजता फोन करून हिशेब विचारला जातो. ही कोणती पद्धत? या अधिकार्यांसोबत असभ्य भाषेत वर्तन केल्याचे डॉक्टर पितळे यांनी यावेळी सांगितले.संपाशिवाय पर्याय नाहीआज यवतमाळमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशी वेळ रत्नागिरीत येऊ नये. कारण आम्ही जनतेशी बांधिल आहोत. मात्र आमच्या अधिकारांवरच घाला घालण्याचा प्रयत्न झाल्यास यवतमाळप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातदेखील संपाशिवाय पर्याय नाही असे सांगून त्यांनी प्रशासनाला एकप्रकारे अल्टीमेटमच दिला आहे.तांत्रिक मान्यताच नाहीकोरोनाचे संकट जिल्ह्यात गंभीर बनत असतानाच टेस्टिंग लॅब सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. लॉकडाऊनच्या काळात अवघ्या १४ दिवसात आरटीपीसीआर लॅब इन्स्टॉल करण्यात आली. मात्र त्या लॅबला अद्याप तांत्रिक मान्यताच मिळालेली नाही. याचे कारण काय? असा सवालदेखील डॉक्टर पितळे यांनी उपस्थित केला.
तर प्रशासन जबाबदार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे हे सिस्टिमविरोधात लढले. त्यामुळेच त्यांचा बळी गेला. मात्र आता आमची राज्य मॅग्मो संघटनेसोबत चर्चा सुरू आहे. डॉक्टर बोल्डे यांना कार्यभार न दिल्यास लवकरच जिल्हा मॅग्मो संघटना आपला निर्णय जाहीर करेल. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार प्रशासन राहील असा इशारा जिल्हा मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भगवान पितळे यांनी दिला आहे.काळ्या फितीने निषेध यवतमाळ प्रकरणात जिल्हाधिकार्यांच्या बदलीची मागणी मॅग्मो संघटनेने लावून धरली आहे. त्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या जिल्ह्यात मॅग्मोचे सर्व सदस्य काळ्या फिती लावून काम करणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.