डिसेंबर अखेरीपर्यंत जिल्ह्यात 337 बंधाऱ्यांची उभारणी

रत्नागिरी:- पाऊस लांबल्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम प्रत्यक्षात राबविण्यास उशिर झाला. तरीही डिसेंबर अखेरिस जिल्ह्यात ३३७ बंधारे श्रमदानातून उभारण्यात यश आले आहे. पुढील महिन्याभरात प्रत्येक ग्रामपंचायतीत दहा बंधारे बांधण्याचे लक्ष जिल्हा परिषद कृषी विभागाकडून गटविकास अधिकार्‍यांना दिले आहे.

यंदा पावसाळी हंगाम लांबल्यामुळे ऑक्टोंबर अखेरपर्यंत नद्या, नाल्यांमधील वाहणार्‍या पाण्याचा जोर अधिक होता. जिल्हयात ४००२ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. कोकण हा अति पर्जन्यमानाचा प्रदेश असूही नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. तसेच डिसेंबर, जानेवारीपासून पाणी टंचाईला प्रारंभ होतो. त्यावर उपाय म्हणून गावागावातील छोट्या नद्या, नाले यांचे पाणी अडवून ते जिरवले तर त्याचा उपयोग अधिक होऊ शकतो. हे पाणी शेती आणि गुरांना पिण्याकरिता, बोअरवेल व विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्याकरिता होते. पाणी अडवण्यासाठी तात्पुरते कच्चे, वनराई व विजय बंधारे बांधल्यास लाखो लिटर पाणी साठवता येते. तसेच टंचाई काळात पाण्याचे दुर्भिक्षही टाळता येते. गेल्या दहा वर्षांमध्ये हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीला लक्ष्य दिले जाते. प्राप्त परिस्थितीचा विचार करुन प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १० बंधारे बांधण्यात यावेत असे कृषी विभागाकडून तालुक्यांना सुचना देण्यात आल्या होत्या. गावातील जल स्त्रोतांजवळ बंधारे बांधलेस लगतचे विहिरीची , बोअरवेलची पाण्याची पातळी वाढणेस मदत होईल. उन्हाळी शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटू शकतो. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांना उन्हाळी पिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीने लोक सहभागातून बंधारे बांधून त्याचा अहवाल जिल्हा परिषद कृषी विभागाला पाठवावेत अशा सुचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून आतापर्यंत ३३७ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात वनराई ६४, विजय ९९ तर १७४ कच्च्या बंधार्‍यांचा समावेश आहे. यासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतीनी लोकसहभागामधून जमा करावयाचे आहे. श्रमदानातून हे बंधारे बांधले जात असल्याने सर्वसाधारपणे पंधरा लाखाहून अधिक रुपयांची बचत झाली आहे. या बंधार्‍यांमध्ये लाखो लिटर पाणी साठले आहे.