रत्नागिरी:- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या रनपच्या सार्वत्रिक निवडणुकीची चाहूल लागल्यानेच पिंजऱ्यातले कोल्हे बाहेर पडले आणि कोल्हेकुई सुरू केलीय. निवडणूक नसती तर हे कोल्हे पिंजऱ्यातच राहिले असते. रस्ते डांबरीकरण करण्याचा शब्द शिवसेनेने दिलाय आणि तो पूर्ण करणारच. डांबरीकरणासाठी निधी आहे, प्रशासकीय मान्यता मिळालीय, ठेकेदार निश्चित झालाय केवळ पाणी योजनेच्या कामामुळे डांबरीकरणाला खो बसला असला तरी राहिलेले रस्ते हे दिवाळीनंतर केले जातील अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाणी योजनेचे काम झालेल्या भागात रस्ते डांबरीकरण सुरू आहे. मात्र सोशल मीडियावर काही विरोधक नाहक बदनामी करत आहेत. अशा विरोधकांना मी आणि माझे नगरसेवक किंमत देत नाही. आमची बांधिलकी ही जनतेशी असून जनतेला दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणारच अस नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांसाठी 10 कोटी निधी मंजूर असून आणखी पाच कोटी निधी येत्या दोन दिवसात मंजूर होईल. आलेल्या निधीतून रस्ते डांबरीकरणासाठी निविदा मंजूर करण्यात आली आहे. टेंडर काढून वर्कऑर्डर घेण्यात आली आहे. ठेकेदार सुद्धा नियुक्त करण्यात आला आहे. शहरात दोन भागात डांबरीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शहरातील अनेक भागात आद्यपही पाणी योजनेचे काम सुरू असल्याने रस्ते डांबरीकरणात विलंब आला. पाणी योजनेच्या ठेकेदाराकडून सुरू असलेल्या संथ कामाचा फटका रनपला बसला. अनेक ठिकाणी नवे रस्ते झल्यानंतर पुन्हा पाईप लाईन टाकण्यासाठी खोदाई केली जात आहे. अशातच पाणी योजनेचे काम करणारे ठेकेदार कोरोना पॉझिटिव्ह निघाले आणि योजनेचे काम थांबले आणि याचा परिणाम डांबरीकरणावर झाला. दरम्यानच्या काळात तोक्ते चक्रीवादळ आले आणि रस्ते डांबरीकरण चार दिवस ठप्प राहिले.
मात्र 20 जून पर्यंत पाऊस लांबल्यास रस्ते 100 टक्के पूर्ण करण्यात येतील. डांबरीकरण शिल्लक राहिल्यास दिवाळीनंतर काम पूर्ण करण्यात येईल. या कालावधीत साईडपट्ट्या खराब झाल्यास त्या पुन्हा दुरुस्त करून देण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची असेल. रत्नागिरी शहरवासीयांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणार असा विश्वास बंड्या साळवी यांनी व्यक्त केला.