मच्छीमारांसाठी मोठी बातमी; ना. उदय सामंतांच्या पाठपुराव्याला यश
रत्नागिरी:- मत्स्य दुष्काळ आणि बदलत्या वातावरणाचा फटका सहन करणाऱ्या कोकणातील मच्छीमारांसाठी डिझेल परताव्यापोटी 40 कोटी 64 लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. या परताव्यासाठी शिवसेना नेते ना. उदय सामंत यांनी मोठा पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून मच्छीमाराना मोठा दिलासा मिळाला आहे.
सातत्याने आलेली वादळे आणि त्यामुळे घटलेले मत्स्योत्पादन यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला होता. या कालावधीत आर्थिक मदत मिळावी यासाठी डिझेल परतावा शासनाने मंजूर करावा यासाठी मच्छिमार संघटनांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेना नेते ना. उदय सामंत यांची भेट घेत साकडे घातले होते. ना. सामंत यांनी देखील मच्छिमार बांधवांची गरज लक्षात घेत राज्य पातळीवर ना. अस्लम शेख, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डिझेल परताव्याचा विषय लावून धरला.
ना. सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून डिझेल परतावापोटी कोकणातील सात जिल्ह्यांसाठी 40 कोटी 64 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7 कोटी 41 लाख तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.