रत्नागिरी:- डिझेलच्या 33 हजार रूपयांच्या उधारीची विचारणा केल्याने माजी नगरसेवक अब्दुल बिजली खान आणि त्यांच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. दगड मारल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, राजिवडा पुलाजवळ ही मारहाण झाली. याप्रकरणी तन्वीर युसुफ मुल्ला व मुस्तकीन युसुफ मुल्ला (रा. राजिवडा) यांच्याविरूद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माजी नगरसेवक अब्दुल बिजली खान यांनी दोन वर्षापूर्वी तन्वीर मुल्ला यांना दोन बॅरल डिझेल घेऊन दिले होते. आपल्या ओळखीवर त्यांनी 33 हजार रूपये किमतीचे डिझेल उधारीवर घेऊन दिले होते. बुधवारी दुपारी 1.45च्या सुमारास खान नमाज पढून घरी जात होते. त्यावेळी तन्वीर मुल्ला आणि त्याचा भाऊ मुस्तकीन मुल्ला दुचाकीवरून आले. त्यांना डिझेलच्या उधारीच्या पैशांबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी मलाच बदमाश आणि फसवा आहेस असे सांगून मारहाण सुरू केली, असे तक्रारीत म्हटले आहे.मारहाण होत असताना कोणीतरी डोक्यात जड वस्तू मारल्याने माजी नगरसेवक खाली कोसळले. त्यावेळी तन्वीरच्या हातात दगड होता. मारहाण होत असल्याचे कळताच मुलगी तौफिका सोडवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत मुलीच्या गळ्यातील 15 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी तन्वीर मुल्ला आणि मुस्तकीन मुल्ला यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.