डरके आगे ‘गटारी’ है…

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण… वाढती मृत्यू संख्या… वाढते संक्रमण…लॉकडाऊनची शक्यता… अशी सगळी पार्श्वभूमी…कोरोनाची भीती… असताना देखील रविवारी रत्नागिरीकरांनी रविवारी गटारी साजरी केलीच…ती पण जल्लोषात. 

रत्नागिरीत रविवारी एक टन मासळी, 10 ते 20 टन चिकन आणि सुमारे एक टन बकऱ्यांचे मटण फस्त करत रत्नागिरीकरांनी गटारी घरीच साजरी केली. 

आषाढ महिना सोमवारी संपत आहे. रविवारी सायंकाळी गटारी अमावस्या सुरू झाल्याने त्याच दिवशी गटारीचा बेत आखला होता. गटारीला मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो. रविवारी मटण शॉप, चिकन सेंटर सह वाईन शॉप्स बाहेर रत्नागिरीकरांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टनसिंग चा पुरता फज्जा उडाला होता. कोरोनाच्या भीतीपुढे गटारीचा आनंद मोठा असल्याचे रविवारी दिसून आले.