म्होरक्याला अटक; मोठ्या टोळीची शक्यता
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी नजिकच्या पेट्रोल पंपातून लांबविण्यात आलेला सुमारे १५ लाख रु.किंमतीचा डंपर ग्रमीण पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी विशाल पास्ते रा.कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी ते बेळगाव मार्गावरील प्रत्येक पेट्रोल पंपातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलीसांनी बेळगाव जिल्ह्यातील चिक्क बागेवाडी येथून हा डंपर ताब्यात घेतला आहे.
बेळगांव जिल्ह्यात डंपर चोरी करणारी मोठी टोळी कार्यरत आहे. डंपर चोरुन आणणाऱ्याला डंपरच्या स्थितीनुसार लाखो रुपये दिले जातात. त्यानंतर नंबर प्लेट, चेसी नंबर, इंजिन नंबर बदलून ते मुळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत विकण्यात येतात. गेले अनेक वर्ष ही टोळी कार्यरत आहे. या प्रकरणी अन्य दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ट्रक, डंपर चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.