डंपरचा हायड्रोलीक पाईप तुटल्याने चालकाने गमावला जीव 

रत्नागिरी:- निष्काळजीपणे डंपर लावल्याने त्याचा हायड्रॉलीक पाईप तुटून डंपर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 31 डिसेंबर रोजी पहाटे 5.30 वा.जयगड येथील आंग्रे पोर्टवर घडली.

नजीर लाडसाहेब मुल्ला (45, रा.दापोली कोंड, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. याबाबत आफाक इफ्तीकर संसारे (23, रा.जयगड आझाद मोहल्ला, रत्नागिरी ) याने जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, शनिवारी पहाटे नजीर मुल्ला आपल्या ताब्यातील डंपर (एमएच- 12-एनएक्स- 7721) मधून माल घेऊन आंग्रे पोर्टवरील रॉक फॉस्फेट प्लॉट येथे आला होता. त्यावेळी डंपर चुकीच्या पद्धतीने लावून त्यातील माल डम्पिंग प्लॉटमध्ये अनलोड करत असताना हायड्रॉलीक पाईप तुटून डंपर पलटी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.