रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील नवीन क्रॉसिंग स्टेशन कार्यान्वित झाली. त्यामुळे क्रॉसिंगसाठी कोकण रेल्वे गाड्या तातडीने पुढच्या प्रवासाला रवाना होऊ लागल्या. मात्र, या क्रॉसिंग स्टेशनचे बांधकाम करणार्या ठेकेदारांची बिले 2.9 टक्के आणि 6.12 टक्केच्या वादात अडकून पडली आहेत. या बिलांच्या मागणीसाठी स्थानिक ठेकेदारांनी कोकण रेल्वेचे उपमहाप्रबंधक राजू पटगर यांना फैलावर घेतले. रेल्वे पोलिस दल वेळीच घटनास्थळी आल्याने पुढील अनर्थ टळला.
रत्नागिरी जिल्ह्यातून जाणार्या कोकण रेल्वे मार्गावर 8, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या 4 आणि रायगड जिल्ह्यातील मार्गावर 3 अशी एकूण 15 क्रॉसिंग स्टेशन बांधण्यात आली. सुमारे 20 स्थानिक ठेकेदारांनी त्यांच्याकडे शेकडो कामगारांच्या मदतीने ही स्टेशन्स उभारली. दोन वर्षांपूर्वी ही स्टेशन्स कोकण रेल्वेच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ही स्टेशन्स कार्यान्वित झाल्यानंतर क्रॉसिंगवर तासनतास रेल्वे गाड्या थांबण्याची समस्या संपुष्टात आली. कोरोना काळात धोका पत्करून ही कामे पूर्ण करून देण्यात आली.
कोकण रेल्वे मार्गावरील या क्रॉसिंग स्टेशनची कामे करण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यावेळी वॅटचा नियम होता त्यानुसार कोकण रेल्वे आणि ठेकेदारांमध्ये करारपत्र झाली. त्यानंतर जुलै महिन्यात जीएसटी लागू झाल्यानंतर 12 टक्के जीएसटी भरण्याची सूचना कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली. या विषयावर को.रे.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, लेखा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक झाली. यावेळी ठेकेदारांनी 2.9 टक्के रिबेट देऊ, असे सांगून हे मान्य नसेल तर करार रद्द करावा, अशी विनंती केली. यावेळी कोकण रेल्वेच्या अधिकार्यांनी नमते घेत सर्व क्रॉसिंग सेंटरचे काम करून घेतले. याच निकषानुसार सुमारे 100 कोटी रूपयांपैकी 80 ते 85 टक्के कामाची बिले अदा केली.
रेल्वे क्रॉसिंग सेंटर ताब्यात येऊन ती कार्यान्वित झाल्यानंतर को.रे.चे उपमहाप्रबंधक राजू पटगर यांनी 6.12 टक्के रिबेट उर्वरित बिलातून देण्याबाबतचे पत्र ठेकेदारांना दिले. आधीच कर्जबाजारी झालेले ठेकेदार या अडवणुकीमुळे संतप्त झाले आणि त्यांनी सोमवारी या उपमहाप्रबंधकांना त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. शाब्दीक बाचाबाची सुरू असतानाच रेल्वे पोलिस दलाचे जवान उपमहाप्रबंधकांच्या दालनात आले. त्यामुळे पुढील चर्चा संयमाने होऊन संभाव्य अनर्थ टळला.
स्थानिक ठेकेदारांनी कोकण रेल्वेच्या 15 क्रॉसिंग स्टेशनच्या बांधकाम अंदाजपत्रकापेक्षा कमी दराच्या निविदा भरल्या. ही कामे झाल्यानंतर आता शेवटची अनामत रकमेसह 12 ते 15 कोटी रूपयांची बिले अदा करण्याबाबत मुख्य व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा सुरू होती. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होण्यापूर्वीच उपमहाप्रबंधकांनी 2.9 ऐवजी 6.12 टक्के रिबेट घेणार असल्याचे कळवल्याने ठेकेदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.