खेड:- ‘उबाठा’ गटाचे युवासेना अधिकारी अजिंक्य मोरे यांना येथील उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर विविध 7 गुन्ह्यांचा समावेश असून 2 वर्षाकरिता जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात येत असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत त्यांना लेखी म्हणणे मांडण्याची मुभा देखील देण्यात आल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटीसीने ‘उबाठा’ गटामध्ये खळबळ उडाली आहे.
अजिंक्य मोरे यांच्यावर येथील पोलीस स्थानकात 7 विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यात अटकही झाली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. अन्य तीन गुन्हे न्यायप्रविष्ठ असून एक गुन्हा पोलीस तपासावर असल्याचे समजते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर आले असता येथील रेल्वेस्थानकातून मुंबईला रवाना झाल्यानंतर अजिंक्य मोरे यांनी रेल्वेस्थानकाजवळ शिवसेना नेते रामदास कदम यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होवून अटकेची कारवाई करण्यात आली होती.
रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने चौकशीसाठी बोलावल्यानंतर युवासेना अधिकारी अजिंक्य मोरे यांनी अधिकाऱ्याबाबत प्रक्षोभक विधाने केल्याचा ठपका ठेवत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. कृत्ये व वर्तनामुळे सर्वसामान्यांच्या जिवितास व मालमत्तेस भय, धोका किंवा इतर इजा होण्याची शक्यता असल्याचे बजावण्यात आलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आले होते.