आठ दिवसात शहर खड्डेमुक्त न झाल्यास आक्रमक आंदोलन: बंड्या साळवी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मुख्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नगरिक हैरण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन गांधीगिरी करण्यात आली. त्यानंतर पालिका मुख्याधिकार्यांना घेराव घालत खड्डे सिमेंट काँंक्रिटने भरण्याची मागणी करण्यात आली. येत्या आठ दिवसात शहर खड्डेमुक्त न झाल्यास पुन्हा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष प्रदिप ऊर्फ बंड्या साळवी यांनी दिला आहे.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार या प्रमुख मार्गावर खड्ड्यांचे साम्रज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाल्यामुळे अखेर गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने शहरातील मुख्य मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळूंखे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांना घेराव घालत जांभ्या चिर्याने खड्डे न भरता ते सिमेंट काँक्रिटने भरण्याची मागणी केली. रत्नागिरी शहर पुर्णत: खड्डेमुक्त झाले पाहिजे. तुम्हाला आठ दिवसांची मुदत देतोय! नंतर शिवसेना जे आंदोलन करेल ते तुम्हाला परवडणार नाही असा इशारा बंड्या साळवी यांनी दिली.
शिवसेनेच्या इशार्यानंतर पालिकेने दुपारपासून खड्डे भरण्याचे काम सुरु केले होते. मारुती मंदिर येथे पेवरब्लॉकने रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरु होते. मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे पालिकेच्या या प्रयत्नांना किती यश येते हे येत्या काहि दिवसांतच स्पष्ट होणार आहे.