रत्नागिरी:- अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून सिमेंटची वाहतूक करणार्या ट्रकना ठरलेले भाडे मिळत नसल्याने, वाढत्या महागाईमुळे त्रस्त ट्रक मालकांनी मंगळवारपासून सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणाहून चुकीच्या पध्दतीने वाहतूक करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास मग संघर्ष अटळ असल्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनने दिला आहे.
रत्नागिरी येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व अन्य ठिकाणी सिमेंटची वाहतूक होत असते. मात्र गेल्या काही महिन्यापासून युनियनने ठरवलेले भाडे कंपनीकडून मिळत नसल्याचे ट्रक मालकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे यापुढे जेवढा माल तेवढेच भाडे मिळावे यासह अनेक मागण्या युनियनकडून करण्यात आल्या आहेत. विशेषत: 40 टनापेक्षा अधिक वाहतूक करणार्या मोठ्या गाड्या बंद करण्यात याव्यात व स्थानिक गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ऑर्डर देताना त्या ऑफलाईन देण्यात याव्यात, स्थानिक ऑर्डर सगळ्यांना समान देण्यात याव्यात, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वाहतुकदारांना समान न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कंपनीमध्ये नव्याने आलेले अधिकारी हे चालकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत, त्यामुळेही वाहतूकदारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे. कंपनीच्या पार्टीने गाडी खाली करुन घेतली नाही तर 700 रुपये भत्ता आणि दुसर्या दिवशी खाली केली तर दोन हजार रुपये भरपाई मिळावी. ट्रक चालकांकडूनच कंपनी जीपीएसचे चार्जेस घेत असल्याने ते घेऊ नयेत अशी मागणी असोसिएशनने केली आहे. युनियनला नोंदणी झाल्याशिवाय नवीन गाड्यांना परवानगी देण्यात येऊ नये यासह अनेक मागण्या असोसिएशनने कंपनीला देण्यात आलेल्या निवेदनात केल्या आहेत.
याबाबत वेळोवेळी कंपनीच्या अधिकार्यांशी असोसिएशनने संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनीच्या अधिकार्यांशी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. वाहतूकदारांबाबत योग्य निर्णय होत नसल्याने ट्रक मालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. त्यामुळे बुधवार 23 ऑगस्टपासून रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनने सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून जवळपास सव्वाशे ते दिडशे ट्रक यामुळे उभे राहणार आहेत.
स्थानिकांना डावलल्यास संघर्ष अटल
अट्राटेक कंपनीच्या अधिकार्यांकडून मनमानी कारभार सुरु आहे. ठरलेले भाडे दिले जात नाही. त्यामुळे बुधवारपासून सिमेंट वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूकदारांना डावलत जर वाहतूक करण्याचा प्रयत्न झाला तर मग संघर्षाला सामोरे जावे लागेल.
–प्रदीप उर्फ बंड्या साळवी
उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन