ट्रॅक्टर उलटून एक ठार, तीनजण जखमी; संगमेश्वर पाटगाव येथील घटना

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव घाटातील किरदाडी फाटा येथे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना घडली. अपघाताची ही घटना शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे.

याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शंभू ईश्वर पासवान (मूळ रा. बिहार) असे मृताचे नाव आहे. आंबव येथून साईटवरून सिमेंटची पोती ट्रॅक्टरमध्ये भरून(एमएच०९, यु ३७६६) हा ट्रॅक्टर पूर गावाच्या दिशेने येत होता. ट्रॅक्टर पाठीमागील ट्रॉलीमध्ये सिमेंटच्या पोत्यांवर चौघेजण बसले होते. पाटगाव घाटातील किरदाडी फाटा येथील उतारात ट्रॅक्टर आला असता वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरील चालक रामनाथ सिंह याचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रस्त्याच्या डाव्या बाजूला जावून पलटी झाला. यामुळे आत बसलेले कामगार बाहेर फेकले गेले. तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील सिमेंटची पोती शंभू ईश्वर पासवान याच्या अंगावर पडल्यामुळे तो पोत्यांखाली दबला गेला. यातच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती देवरूख पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार डी. एस. पवार, हे. काँ. सचिन भुजबळराव, हे. काँ. संतोष सडकर, पो. ना. संदीप जाधव, पो. काँ. पायल भिसे आदिंनी घटनास्थळी धाव घेत रितसर पंचनामा केला. सिमेंटच्या पोत्यांखाली दबलेल्या शंभू पासवान याला देवरूख ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. तर अपघातात संजीत योगेंद्र गिरी, विश्वनाथ वैजनाथ पासवान, कारी नगीना पटेल हे जखमी झाले आहेत. यापैकी कारी पटेलला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे. अपघातप्रकरणी देवरूख पोलीसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरूख पोलीस करीत आहेत.