टोल फ्री क्रमांकावर खोटी तक्रार नोंदविणाऱ्या तरुणावर गुन्हा

राजापूर:- संकटात असलेल्या कोणत्याही नागरिकाला पोलीसांची तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने पोलीसांकडून जारी करण्यात आलेल्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर कोणतेही कारण नसताना व कोणतेही संकट ओढवलेले नसताना खोटा फोन करून खोटी तक्रार देत नाहक त्रास दिल्याच्या आरोपाखाली राजापूर पोलीसांनी तालुक्यातील जयदीप प्रकाश राघव (वय ३२, रा. गोठणेदोनिवडे राघववाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी नरेश विष्णू गुरव यांनी तक्रार नोंदवली आहे. गुरव हे शनिवारी १९ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते २० ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत डायल ११२ वर डयुटी करत होते. या कालावधीत जयदीप राघव याने डायल ११२ च्या बी.एम. २ या मशिनवर सी. एफ.एस.आय.डी. सी.एफ.एस. १३६३५०१० या आयडी वरुन उद्देशपूर्वक खोटी म हीती आहे हे माहीत असताना खरी म्हणुन कळवून नाहक त्रास दिला, असा आरोप फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरव यांच्या या तक्रारीवरुन जयदीप राघव याच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे १७७ व १८२ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अशा प्रकारे फोन आल्यानंतर त्या ठिकाणी तत्काळ या ११२ कॉल ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी प्रसाद शिवलकर व नरेश गुरव हे गोठणेदोनिवडे राघववाडी येथे रात्री ११ वाजता पोहचले. मात्र त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता कोणताही प्रकार वा तक्रार त्याठिकाणी नव्हती असे आढळून आले. त्यामुळे जयदीप याने पोलीसांना नाहक त्रास देण्याच्या हेतूने खोटा कॉल केल्याचे पुढे आले. नागरिकांनी असे प्रकार करू नयेत असे आवाहन पोलीस निरीक्षक भरत लाड यांनी केले आहे.