संगमेश्वर:- तालुक्यातील दोभोळे येथील टॉवरच्या बॅटऱ्या चोरण्याचा प्रयत्न करणारे याबाबत 112 हेल्पलाईन क्रमांकावर कॉल येताच देवरुख पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साखरपा दूरक्षेत्र पोलिसांची कारवाई करत चोरट्यांना 24 तासांत जेरबंद केले.
रविवारी रात्री रत्नागिरी-कोल्हापूर मार्गांवरील दाभोळे गावाजवळ असणार्या जंगलवाडी फाट्यानजीक असणार्या टॉवरमधील बॅटर्या चोरण्यासाठी चोर आले असताना सिक्युरिटी अलार्म वाजल्याने चोरट्याची पंचायत झाली. त्या ठिकाणी असणारा सुरक्षा रक्षक जागा झाला. त्यामुळे चोरटे त्या ठिकाणाहून त्यांनी सोबत आणलेली टाटा ऐस गाडी टाकून पसार झाले. त्यावेळी त्या सुरक्षा रक्षकाने 112 या पोलीस हेल्पलाईन क्रमांकाला कॉल केला.
यावेळी प्रत्यक्ष ड्युटीवर असणारे पोलिस हेड काँ. नितीन जाधव व चालक कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी देवरुख पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक नामदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ गाठले. त्यांनी त्या ठिकाणी असलेली टाटा ऐस गाडी आणि चोरी करण्यासाठी वापरलेले सामान जप्त करण्यात आले. घटना स्थळावरून आरोपी फरार झाल्याने त्यांना शोधणे अवघड काम होते. त्या नंतर साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे नितीन जाधव, संजय कारंडे,नितीन भोंडवे, तानाजी पाटील, वैभव नटे यांनी वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली सुत्रे हलवत चोरट्याना जेरबंद करण्यात आले.
हे चोरटे लांजा येथील असून बॅटरी चोरीसाठी आलेल्या त्या चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. या आधी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बॅटरी चोरी झाल्याचे गुन्हे विविध पोलिस स्थानकात दाखल आहेत. त्यामुळे अन्य चोर्या देखील उघडीस होण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे धडक कारवाई करत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.