टेंभ्ये ग्रामपंचायतीसाठी अटीतटीची लढत रंगण्याची चिन्हे 

रत्नागिरी:- तालुक्यातील हरचिरी जिल्हा परिषद गटातील टेंभ्ये ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कट्टर कार्यकर्त्या माजी सरंपच कांचन नागवेकर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातून रिंगणात उतरल्या असून त्यांच्याविरोधात गावपातळीवरील जुगाई पॅनेलचे उमेदवार उभे आहेत. तर टिके ग्रामपंचायतीत बाळासाहेबांच्या शिवसेनेला ठाकरे सेनेचे आव्हान आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरु आहे. थेट सरपंच निवडणुकीमुळे सर्वच पक्षांची कसरत सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यात शिवसनेत ठाकरे आणि शिंदे यांच्या समर्थकांमध्ये वर्चस्वासाठी चुरस आहे. हरचिरी गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी महेंद्र झापडेकर यांनी शिवसेना तळागाळात पोचवली आहे. या परिसरातील टेंभ्ये आणि आजूबाजूच्या परिसरात मंत्री सामंत यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कांचन नागवेकर यांनीही ओळख निर्माण केली आहे. शिवसेना एकत्र असताना मंत्री सामंत यांच्या नेतृत्वाखाली टेंभ्ये परिसरात श्रीमती नागवेकर कार्यरत होत्या. मागील पाच वर्ष त्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. आताही थेट सरपंच निवडणुकीत त्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात गाव पातळीवरील जुगाई पॅनेलच्या अशोक नागवेकरांचे आव्हान आहे. त्यांना उध्दव ठाकरे शिवसेनेकडून पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. मंत्र्यांचे समर्थक रिंगणात असल्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सात सदस्याची ही ग्रामपंचायत असून एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यावर उध्दव ठाकरे गटाने दावा केला आहे. तर उर्वरित ६ सदस्यांच्या जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच आणि सदस्य दोन्हीकडे वर्चस्व मिळवून ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी ठाकरे-शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहेत.
हरचेरी गटातील टिके ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी ठाकरे सेनेकडून भिकाजी शिनगर यांच्या विरोधात शिंदे सेनेचे गुरुदास गोवीलकर रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या सर्वच्या सर्व नऊ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक पातळीवरील ग्रामस्थांना यश आले आहे. शिवसेना फुटल्यानंतर मतदारांचा कौल कुणाकडे राहणार याची चाचपणी या निवडणुकीतून होणार असल्याने ठाकरे आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार ताकद लावली जात आहे.