टीईटी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 54 शिक्षकांना दोन दिवसांची डेडलाईन 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 2013 नंतर नियुक्ती देण्यात आलेल्या 330 शिक्षकांनी टीईटी ची प्रमाणपत्रे सादर केली आहेत. अजूनही 54 जण प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी शिल्लक असून त्यांना 2 दिवसांची ‘डेडलाईन’ जि.प.शिक्षण विभागाने दिली आहे.  

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र उमेदवारांना उत्तीर्ण करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे राज्य प्रशासनाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱयांना मुख्याध्यापकांकडून हे प्रमाणपत्र सादर करण्याचे फर्मान काढलेले आहे. 13 फेब्रुवारी 2013 नंतर राज्यातील शाळांत पाचवी ते आठवीपर्यंत रुजू शिक्षकांचे मूळ टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा निर्णय घेतला आहे.   शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर ही परीक्षा सुरू झाली तेव्हापासून उत्तीर्ण परीक्षार्थींचे मूळ प्रमाणपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱयांना तत्काळ सर्व मुख्याध्यापकांना संबंधित शिक्षकांचे मूळ टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातीलही शिक्षण विभागाकडून 2013 नंतर भरतीत नियुक्ती दिलेल्या टीईटी परिक्षा धारक शिक्षकांकडून प्रमाणपत्रे मागवण्यात आली आहेत.  

2019 मध्ये 408 शिक्षकांची भरतीत 394 जणांची नियुक्ती शिक्षक पदी देण्यात आली. त्यातील 15-20 जणांनी राजीनामे दिले होते. शिक्षण विभागाने त्या शिक्षकांकडून टीईटी प्रमाणपत्रांची केलेल्या मागणीनुसार 330 जणांनी आतापर्यंत आपली प्रमाणपत्रे सादर केली आहेत. अजूनही 54 शिक्षकांची प्रमाणपत्रे येणे बाकी आहे. त्यांना दोन दिवसांत पमाणपत्र सादर करण्याची मुदत दिलेली आहे.