जिल्ह्यातील केंद्र; स्थानिक किती याबाबत संभ्रम
रत्नागिरी:- शिक्षक पात्रता परिक्षेतील (टीईटी) घोटाळ्यातील समाविष्ट राज्यातील शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रांवर बसलेल्या ३७ जणांचा समावेश आहे. बोगस प्रमाणपत्र मिळवणार्या या शिक्षकांवर कायम बंदी घालण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
राज्यभर टीईटी घोटाळा चांगलाच गाजत असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक उमेदवारांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपुर्वी राज्यातील बोगस प्रमाणपत्र असलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता नाशिकमधील समावेश असलेल्यांवर वेतन बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा टप्प्याटप्प्याने उघडकीस आणला गेला. त्याचे धागेदोरे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आढळू लागले आहेत. त्याचे लोण रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पोचले आहे. बोगस प्रमाणपत्राच्या राज्यातील यादीत ७ हजार ८८० जणांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सहा केंद्रांवर २०२० मध्ये परिक्षा झाली होती. बोगस प्रमाणपत्रांमध्ये या केंद्रांवरील ३७ उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. या उमेदवारांमध्ये स्थानिक किती याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.