टाळेबंदीचा फायदा; जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या लागवडीत 20 टक्क्यांची वाढ

रत्नागिरी:- कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या टाळेबंदीने शेतीची कामे करण्यास नसलेला अडथळ्याचा फायदा घेत यंदा रब्बी हंगामातील लागवडीत गतवर्षाच्या तुलनेत 20 टक्के वाढ झाली. कोकणात रब्बी लागवडीला उदासीनता असते; परंतु गावातल्या गावात रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेकांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला. जिल्ह्यात यंदा 4 हजार 538 शेतकर्‍यांनी 7 हजार 590 हेक्टरवर लागवड केली.

गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे उन्हाळ्यातही पिकांसाठी पाण्याची चांगली उपलब्धता, कृषीच्या प्रोत्साहन देणार्‍या योजना आणि लॉकडाऊन काळात कृषी क्षेत्राला वगळण्यात आल्याने या सर्वांचा एकत्रित परिणामाने रब्बीत पिके घेण्याकडे कल वाढला. कोकणात खरीपाची शेती केली जाते हा इतिहासात शिकविलेला पाठ विसरून गेली अनेक वर्ष रब्बीतही लागवड करण्यासाठी  कृषीविभगाकडून उद्युक्त केले जात होते. त्यासाठी विविध योजनाही राबविण्यात आल्या होत्या. यामध्ये बियाणांसाठी अनुदान, यांत्रिकीसाठी प्रोत्साहन, सिंचनाच्या ऑनलाईन योजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती. या योजनांना मिळालेल्या प्रतिसादातून रब्बीतील लागवड करण्यात शेतकर्‍यांची मानसिकता बदलत नव्हती. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रब्बी हंगामातच सुरू झाल्यानंतर उद्दभवलेल्या लॉकडाऊन स्थितीत कृषी क्षेत्र वगळण्यात आले होते. त्यामुळे रब्बीतही रोजगाराची उपलब्धता होती. त्यामुळे लागवड क्षेत्रात वाढ झाली. या योजनेत साडेचार हजार शेेतकर्‍यांनी सहभाग नोंदविताना साडेसात हजार हेक्टर क्षेत्र लागववडीखाली आणले. दरवर्षी रब्बी हंगामात सरासरी पाच हजार हेक्टरवर लागवड केली जाते. त्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. रब्बीमध्ये भात लागवडीचे प्रयोग संगमेश्‍वर, दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यात झाले. सर्व जग टाळेबंदीत असताना कृषी क्षेत्रात मात्र हातांना काम होते. त्यामुळे रब्बी हंगामातील लागवडीकडे शेतकर्‍यांनी विशेष लक्ष दिले.