झाली भैरी शिवाची भेट हो; राजीवडा येथे रंगला सोहळा 

रत्नागिरी:- एक वर्षाचा हा काळ पहा त्यांचा बंधूभाव.. भेट झाली पहा हो भैरी-शिवाची… राजिवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्री देव भैरवाच्या पालखी भेटीचा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी संपन्न झाला. हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी विश्वेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भैरी-शिवाची भेट होताच ढोलताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत हा सोहळा साजरा केला. 

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्रीदेव काशीविश्वेश्वर मंदिर व मांडवी येथील श्रीदेव भैरव मंदिरामध्ये नामसप्ताहाला प्रारंभ होतो. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी या सप्ताहाची समाप्ती होती. नामसप्ताहाचा एक आठवडा मंदिरात मोठ्या भक्तीभावाने देवाची आराधना करण्यात येते. सप्ताहाच्या समाप्तीनंतर दोन्ही मंदिरामध्ये पालख्यांमधून देवाची मिरवणूक काढण्यात येते. मांडवी येथील श्रीदेव भैरव राजिवडा येथे काशीविश्वेश्वराच्या भेटीला येतो. या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक विश्वेश्वर घाटीमध्ये उपस्थित होते. 

टाळ, मृदुंगांचा आवाज, ढोल-ताशांचा गजर व भजनामध्ये भाविक दंग झाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पालखी भेटीचा हा सोहळा रंगला. पालखी भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्यांच्या मानकर्‍यांनी श्रीफळ देऊन देवाची भेट घडवून आणली. नामसप्ताहाच्या समाप्तीनंतर श्री देव भैरवाची पालखी मांडवीकडे रवाना झाली. त्यानंतर पाच प्रदक्षिणा पूर्ण करत श्री देव काशीविश्वेश्वराची पालखी मंदिरामध्ये विसावली. या नामसप्ताहाच्या सांगता सोहळ्यामध्ये भाविकांनी देवाकडे समाजाच्या सुखशांतीचे गार्‍हाणे घातले.(रत्‍नागिरी एक्सप्रेस वृत्त)