जोरदार शक्तिप्रदर्शन करत खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेमार्फत विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रत्नागिरीत शक्तिप्रदर्शन केले. हजारो कार्यकर्त्यांच्या रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन खा.राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ढोलताशांच्या गजरात खा.राऊत यांना खांद्यावर घेत शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रचंड रॅलीमुळे शहरातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने विद्यमान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली होती. मंगळवारी दुपारी खा.राऊत यांनी शहरातील मराठा मंडळ हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. मोजकेच कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी येतील अशी व्यवस्था खा.राऊत यांनी केलेली असतानाच हजारो कार्यकर्ते सभागृहाजवळ एकत्र आल्याने सभागृहाबाहेर तिन्ही रस्त्यांवर कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी झाली. मेळाव्याला सभागृह अपुरे पडल्यामुळे कार्यकर्त्यांना बाहेर थांबावे लागले.

या मेळाव्याला शिवसेनानेते तथा आमदार भास्करशेठ जाधव, युवा सेनेचे राज्य सरचिटणीस वरूण सरदेसाई, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, संजय कदम, हुस्नबानू खलफे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, विक्रांत जाधव, जयसिंग घोसाळे, संतोष थेराडे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर, रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, जगदिश राजापकर, शेखर घोसाळे, राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, रत्नागिरी तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत,  काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, काँग्रेस नेते प्रवीण भोसले, रमेश कीर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार राऊत म्हणाले, विरोधी उमेदवाराची आपल्याला चिंता नाही. महायुतीला अजून उमेदवार मिळाला नाही. तुम्ही सगळे माझ्यासोबत असल्यामुळे मी तिसऱ्यांदा खासदार होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्या विजयासाठी अपार मेहनत घेत आहेत. आपण स्वतः मतदारसंघाचा पहिला दौरा पूर्ण केला आहे. 107 खळा बैठकांच्या माध्यमातून आपण मतदारांपर्यंत पोहोचलो आहोत. महिन्यातील 20 दिवस व दिवसातील 14 तास काम करणारा खासदार पुन्हा तिसऱ्यांदा तुम्हाला मिळणार असल्याचा विश्वास खा.राऊत यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते आ.भास्करशेठ जाधव यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. आपण आज खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत. यापुढील काही दिवस इतर कामे बाजुला ठेवून केवळ पक्षासाठी व आघाडीसाठी झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे. या निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा विजय निश्चित असल्याचा दावा आ.भास्करशेठ जाधव यांनी केला. त्यानंतर खा.राऊत यांनी मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.