जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

रत्नागिरी:- जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे सोमवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेतील श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी हजेरी लावली; मात्र पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भक्तगण माघारी परतत होते. दिवसभरामध्ये आठ हजाराहून अधिक पर्यटकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगितले.

सोमवारी संकष्टी चतुर्थी असल्याने तसेच गणेशोत्सवही पार पडल्याने भाविकांसह पर्यटक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे दाखल झाले होते. संकष्टीमुळे येथील मंदिरात श्रींच्या मूर्तीसमोर फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. मुख्य पुजारी अभिजित घनवटकर तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी ही आरास केली होती. पहाटे 5 वाजल्यापासून दर्शनाला सुरवात केली. स्थानिकच नव्हे तर परजिल्ह्यातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी शिस्तबद्धपणे गणरायाचे दर्शन घेतले. रविवारपाठोपाठ सोमवारी (ता. 2) गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असल्यामुळे त्याचा फायदा अनेक भक्तांना झाला. रविवारी दिवसभर वेगवान वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडत होता. सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सोमवारी सकाळपासून भाविक गणपतीपुळ्यात दाखल झाले. दर्शन घेतल्यानंतर पर्यटकांनी चौपाटीवर फेरफटका मारला; मात्र समुद्र खवळलेला असल्याने पर्यटक किनार्‍यावरच होते. किनारी भागात जीवरक्षक नेमण्यात आले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत साडेसहा हजार पर्यटकांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर पर्यटकांची संख्या कमी होत गेली. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे आठ हजाराहून अधिक लोकांनी दर्शनाला मंदिरात हजेरी लावली. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान संकष्टीनिमित्त श्रींची पालखी प्रदक्षिणेला बाहेर पडली होती. मंदिराच्या प्रमुखांसह ही प्रदक्षिणा होते. त्यानंतर चंद्रोदय होईपर्यंत म्हणजेच 8.39 वाजेपर्यंत भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले.