जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलकाला तब्बल १३ वर्षांनी बेड्या

रत्नागिरी:- जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील हिंसक आंदोलन केल्याचा आरोप असलेल्या संशयिताला नाटे पोलिसांनी १३ वर्षानंतर अटक केली. नायाब मजिद सोलकर (वय ४६, रा. साखरीनाटे, सध्या अलिबाग) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव, शासकीय मालमत्तेचे नुकसान, शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, जाळपोळ आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.

पोलिसांकडून अटक केल्यानंतर सोलकर याने सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सोलकर याची २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. २०११ ला झालेल्या हिंसक आंदोलनानंतर नाटे पोलिस ठाण्यात नायाब सोलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. पोलिसांकडून मागील १३ वर्षे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. सोलकर हा अलिबाग येथे वास्तव्य करत असल्याचे आढळून आल्यानंतर नाटे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील माहितीनुसार १८ एप्रिल २०११ ला राजापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलन पेटले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये साखरी नाटे येथे आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. तसेच पोलिसांची वाहनेही जाळण्यात आली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये तबरेज सायेकर या तरुणाचा मृत्यू झाला होता. पोलिसांवर झालेला हल्ला व शासकीय मालमत्तेचे झालेले नुकसान या प्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. यामध्ये सोलकर याचेही संशयितामध्ये नाव होते. यानंतर नायाब सोलकर हा बेपत्ता झाला होता. त्याच्याविरुद्ध नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.