रत्नागिरी:- शहराजवळील जे. के. फाईल्स कंपनीला टाळ्ं लावण्याचा घाट सुरू आहे. त्यामुळे तीनशेपेक्षा जास्त कामगार बेरोजगार होण्याची भिती व्यक्त होत आहे.त्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दि. २६ जूनला मुंबईतील निवासस्थानी कामगार व कंपनीचे व्यवस्थापन यांची बैठक बोलावली होती; मात्र या बैठकीला कंपनीचे सीईओच हजर राहिले नाहीत. कंपनीने पाठ फिरवल्याने कामगारांचा प्रश्न अधांतरीच आहे.
तालुक्यातल्या शेकडो कामगारांच्या उदरनिर्वाहाचे म्हणून जे. के. फाईल्स कंपनीकडे पाहिले जाते; परंतु काही वर्षांपासून कंपनीमध्ये कामगार आणि व्यवस्थापनामध्ये खटके उडत होते. यामुळे काही विभाग कंपनीने हळूहळू बंद केले. त्यामुळे कामगार अतिरिक्त होऊ लागले आहेत. आता कंपनी बंद करण्याच्यादृष्टीने व्यवस्थापनाच्या हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे; परंतु काम करणाऱ्या तीनशे कामगारांना कंपनीकडून अद्याप मोबदला मिळालेला नाही. कामगारांच्या मोबदल्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने कामगारांचा प्रश्न अद्यापही अधांतरी आहे. कामगारांचे म्हणणे आहे की, कंपनीचे जे ३० कामगार आहेत त्यांना सरसकट २५ लाखप्रमाणे मोबदला द्यावा; परंतु कंपनीने स्पष्ट सांगितले आहे, आर्थिक बजेट नसल्यामुळे आम्ही ७ लाख रुपयांचाच मोबदला देऊ शकतो. त्यामुळे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी दि. २६ जूनला बोलावलेल्या बैठकीत काही तरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा होती; परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशा पडली आहे; मात्र उद्योगमंत्री यातून काहीतरी तोडगा काढून आम्हाला न्याय देतील, अशी कामगारांची अपेक्षा आहे.