जि. प., पं. स. ची प्रभाग रचना नव्याने; आरक्षण देखील पुन्हा पडणार

रत्नागिरी:- प्रभाग रचना जुन्या निर्णयानुसार करण्याच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे नव्याने रचना होणार असून आरक्षणही पुन्हा काढले जाणार आहे. त्याचा फायदा रत्नागिरी जिल्ह्यातील फटका बसलेल्या प्रस्थापितांना होणार आहे. नव्याने पडलेले आरक्षण पथ्थ्यावर पडेल या आशेने अनेकांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवण्यास सुरवात केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना नव्याने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेचे गट ६२ तर नऊ पंचायत समितींमधील गण १२४ झाले होते. आरक्षण प्रक्रियाही काही दिवसांपुर्वी पार पडली. यामध्ये जिल्हा परिषदेतील अनेक प्रस्थापितांचे पत्ते कट झाले होते. काहींनी आजूबाजूच्या गट, गणामध्ये संधी मिळते का ते पाहण्यास सुरवात केली. उदय बने, संतोष थेराडे, रोहन बने, विनोद झगडे, परशुराम कदम, बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, अण्णा कदम या तगड्या सदस्यांच्या गटात आरक्षण पडल्यामुळे नवीन गट शोधण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. चिपळूण तालुक्यातील अकरा गटामध्ये एक सर्वसाधारण महिला आरक्षण पडले तर उर्वरित दहा अनारक्षीत राहिल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली होती. अन्य सर्व तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात उलथा-पालथ झाली होती. तीच परिस्थिती पंचायत समित्यांमध्येही पहायला होती. नव्या प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडतीनंतर काही माजी सदस्यांनी आपापली प्यादी पुढे करण्यास आरंभ केला. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने नवीन प्रभाग रचनेपेक्षा २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे जाणार असून आरक्षणही नव्याने पडणार आहे. आरक्षण पडल्यामुळे पत्ता कट झालेल्या नेत्यांना दिलासा मिळाला असून आरक्षण प्रक्रिया पुन्हा झाल्यास त्याचा फायदा होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान, प्रभागांची रचना लोकसंख्येच्या निकषानुसार बदलल्यामुळे अनेक ठिकाणी गावांमध्ये अदलाबदल झाले होते. परिणामी शिवसेेनेच्या काही सदस्यांची मोठीच गैरसोय झाली होती. वर्षानुवर्षे एकाच गटात प्रस्थ असलेल्या गट, गणातील नेत्यांची गावे बदलली होती. त्यामुळे आपण नक्की कोठून रिंगणात उतरायचे याबाबतच प्रश्‍नचिन्ह होते. मंत्रीमंडळाच्या निर्णयाचा फायदा या लोकांना होणार आहे.

तर ५५ गट आणि ११० गण राहतील

जिल्हा परिषदेचे ७ गट तर पंचायत समितीचे १४ गण नव्याने वाढले होते. मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे जुन्या रचनेप्रमाणे ५५ गट आणि ११० गण राहतील असा अंदाज बांधला जात आहे. गावांचीही अदलाबदल होणार नसल्याने प्रस्थापित गाव पुढार्‍यांनी निःश्‍वास सोडला आहे.