रत्नागिरी:- शासनाकडून आलेल्या सात निकषानुसार जिल्हा परिषदेच्या ८७८ प्राथमिक शाळा दुर्गम भागात वसलेल्या आहेत. सर्वाधिक शाळा खेड, राजापूर तालुक्यात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे ही यादी पाठविण्यात येणार असून त्यानंतर हरकती मागविण्यात येणार आहेत. यादी निश्चित केल्यानंतर जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांची प्रक्रिया होणार आहे.
जिल्हापरिषदेच्या २ हजार ६२२ शाळा असून सुमारे पावणेसात हजार शिक्षक कार्यरत आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया झालेली नव्हती. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात बदल्या करताना समायोजन प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. यावेळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बदल्यांची प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाने २०२१-२२ शैक्षणिक वर्षांसाठी सुगम, दुर्गम भागातील शाळा निश्चित करण्याचे आदेश जिल्हापरिषदांना दिले. त्यानुसार शिक्षण विभागाकडून कार्यवाही चालू केली; परंतु वेळेत यादी तयार न झाल्याने अखेर गतवर्षीही बदल्या झाल्या नाहीत. पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापुर्वी बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी दुर्गम शाळांची यादी तालुक्यांकडून मागवण्यात आली होती. शासनाने दुर्गम शाळा ठरवण्यासाठी सात निकष दिले होते. त्यातील कोणत्याही तिन निकषांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यात नक्षलीग्रस्त भाग, दोन हजार मिलीमीटर पर्जन्यमान, हिस्त्र वन्यप्राण्यांचा त्रास, वाहतूकीच्या दृष्टीक्षेपात किंवा रस्ते नाहीत, संपर्क यंत्रणा नसलेल्या शाळा, डोंगरी भाग, राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून दहा किलोमीटरपेक्षा दूरवर असलेल्या शाळांचा समावेश आहे. प्राथमिक यादीमध्ये ८७८ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. तीन वर्षांपुर्वी झालेल्या सर्वेक्षणात नऊशेहून अधिक शाळा होत्या. त्यावेळी ही यादी वादग्रस्त ठरली होती. दुर्गम भागातील शाळा सुगममध्ये असा गोंधळ यादी बनविताना घालण्यात आला होता. यावरुन लोकप्रतिनिधी विरुध्द जिल्हा परिषद प्रशासन आमनेसामने आले होते. यंदाही काही शाळांवरुन गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात हिंस्त्र वन्यप्राण्यांचा त्रास असलेली २१ ठिकाणे आहेत. त्यातील दहा शाळा रत्नागिरी तालुक्यातील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. बिबट्याच्या त्रासामुळे लोकवस्तीपासून दुरवर असलेल्या शाळांमध्ये जाण्यास अनेक मुले आणि त्यांचे पलाक तयार नव्हते. दुर्गम शाळांच्या निमित्ताने ही माहिती पुढे आली आहे.