रत्नागिरी:- सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहिलेल्या जिल्हा परिषद चिपळूण बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तर खेड तालुक्यातील तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांकडून पैसे घेतल्याप्रकरणी चौकशीचे आदेश अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिले.
नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा सभागृहात विक्रांत यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच सभा झाली.
यावेळी उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, सर्व सभापती आणि सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शामराव पेजे सभागृहात बांधण्यात आलेल्या नूतन सभागृहात पार पडली. चिपळूण कार्यकारी अभियंत्यांच्या गैरहजेरीवरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. दर तीन महिन्यांनी सभा होत असल्याने अधिकार्यांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तरीही किरकोळ कारण देत अधिकारी गैरहजर राहिले. ते वर्षा अखेरीनिमित्त फिरण्यासाठी गेल्याचे अध्यक्षांनी सभेत उघड केले. शेवटी या अधिकार्यावर कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसे चौकशीचे आदेशही अध्यक्ष जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. खेड तालुक्यातील तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.त्यानुसार आरोग्य सभापती उदय बने व आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी तिथे उपस्थित रूग्णांकडून 100 रूपये घेत असल्याचे उघड झाले होते, अशी माहिती उदय बने यांनी सभागृहात दिली. त्यानुसार त्या वैद्यकीय अधिकार्यावरही कारवाई करण्याच निर्णय झाला.