जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी (परिचर) यांची बदली प्रक्रिया तसेच प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी संघटना ही संघटना श्रमीक संघ अधिनियम १९२६ नुसार नोंदणीकृत व मान्यता प्राप्त संघटना असून संपूर्ण महाराष्ट्र भर संघटनेचे कार्यक्षेत्र आहे. संघटना जिल्हा परिषदेच्या सर्व संर्वागातील कर्मचार्यांची अडीअडचणी संविधानीक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करत असते कर्मचारी व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून संघटना मागील दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काम करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी त्यांच्या जिल्हांतर्गत बदली संदर्भात राज्य संघटनेला पत्र दिलेले आहे. जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाने बदली विषयी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द केली. पण काही कारणास्तव परिचर बदल्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे एकाच विभागात ८ ते १० वर्ष, काम करावे लागत आहे. बदली अत्यंत गरजेची असतानाही याकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी विनंत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. काही वर्षांपुर्वी परिचरांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या; मात्र इच्छीत ठिकाणी बदली न झालेल्यांपैकी काहींनी प्रतिनियुक्ती घेतली. त्या प्रतिनियुक्त्या रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक किंवा दोन पुरुष परिचर कार्यरत आहेत. त्या ठिकाणी स्त्री परिचर नियुक्त व्हावी असेही त्यात नमुद केले आहे. हे निवेदन जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत यांच्याकडे संघटनेतर्फे देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम भगत, विश्वनाथ घाणेकर, दत्ताराम जोशी आदी उपस्थित होते.