जि. प. च्या ‘क’ वर्ग कर्मचारी भरतीचा नवीन आकृतिबंध तयार करा

रत्नागिरी:-जिल्हा परिषदेच्या ‘क’ वर्ग कर्मचार्‍यांच्या तेरा हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून तांत्रिक बाबीत अडकलेली असताना आता ग्रामविकास मंत्रालयाने या संवर्गातील नवीन आकृतिबंध तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी सादर करण्यात आलेला आकृतिबंध गुंडाळला जाणार असून, नवीन आकृतिबंध तयार करून शासनाला सादर केल्यानंतरही रिक्त पदे भरण्यासंदर्भातील संदिग्धता कायम राहणार आहे.

लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच कर्मचारी निवृत्त होत असल्याने रिक्त जागा वाढत असल्याने प्रशासकीय कामकाजाचा ताणदेखील वाढत आहे. राज्य शासनातर्फे गेल्या आठ वर्षांपासून रिक्त पदांची भरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांवर कामांचा ताण अधिक वाढला आहे. राज्य शासनाने क वर्गातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी 2019 मध्ये एजन्सी नियुक्त केली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांसाठी क वर्ग संवर्गातील जवळपास तेरा हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन जवळपास अकरा लाख 28 हजार अर्ज दाखल झाले. मात्र, तांत्रिक कारणामुळे परीक्षा घेतल्या गेल्या नाही. आता नव्याने आदेश काढताना जिल्हा परिषदांना क वर्गातील पदे भरण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांचीच परीक्षा घेण्याच्या सूचना आहेत. मंजूर पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध अंतिम करून शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना आहेत.
ग्रामविकास विभागाने रिक्त पदे जिल्हा परिषदांमार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.