जि. प. अध्यक्षपद; आरक्षणाआधीच अनेकांची तयारी

रत्नागिरी:-जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या प्रारूप रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर गावोगावी पुन्हा गट व गणरचनेच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे या रचनेत आपल्या सोयीची गावे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच काही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीही तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यापूर्वी सर्वसाधारण, ओबीसी अशा सर्व प्रवर्गांच्या आरक्षणाचे चक्र पूर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपदाचे आरक्षण हे महिला किंवा अनुसूचित जमातीसाठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये दर अडीच वर्षानंतर अध्यक्ष पदाचे आरक्षण पडते. सन 2000 पासून याची सुरूवात झाली. सध्याच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 20 सप्टेंबरला संपत आहे. यानंतर नव्याने आरक्षण पडणार आहे. साधारण दोन ते तीन महिने अगोदर आरक्षण पडते. परंतु आता दीड महिना उरला असतानाही अद्याप आरक्षण न पडल्यामुळे इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा आरक्षण सुरू झाल्यानंतरचा इतिहास बघितला तर सन 2000 मध्ये प्रथमच खुल्या वर्गासाठी आरक्षण पडले आहे. यावेळी शिवसेनेची सत्ता होती. सेनेच्या अंतर्गत निर्णयानुसार अध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांना सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ सुरू झाला होता. त्यानुसार आरक्षण पडल्यानंतर पहिले अध्यक्ष हे जयसिंग घोसाळे झाले. त्यानंतर राजेंद्र महाडिक हे अध्यक्ष बनले. सन 2002 मध्ये प्रथमच महिलांसाठी अध्यक्ष पद राखीव झाले. यावेळी पहिला महिला जि. प. अध्यक्ष पदाचा मान राजापूर तालुक्यातील प्रतिभा गुरव यांनी पटकावला. त्यानंतर देवरूखच्या रश्मी कदम या अध्यक्ष बनल्या. सन 2007 मध्ये अध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण पडले. यावेळी शिवसेनेकडे शांताराम जाधव हे एकमेव त्या प्रवर्गातील असल्याने त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती.
सन 2009 मध्ये महिलांसाठी पुन्हा हे पद राखीव झाले. खुल्या प्रवर्गातील आरक्षण असल्याने यावेळी रचना महाडिक अध्यक्ष बनल्या. त्यानंतर रोहिणी दळवी यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. सन 2012 मध्ये मात्र शिवसेनेची सत्ता असताना आरक्षणामुळे अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा बनला. यावेळी अनुसूचित जातीसाठी हे आरक्षण पडले होते. सेनेकडे या प्रवर्गातील एकही सदस्य नसल्याने शेवटी चिपळूणमधील राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव या अध्यक्ष बनल्या. सन 2014 मध्ये इतर मागास प्रवर्गासाठी हे पद राखीव झाले. यावेळी लांजाचे जगदीश राजापकर अध्यपदी विराजमान झाले. यानंतर चिपळूणचे तुकाराम उर्फ बुवा गोलमडे हे अध्यक्ष बनले.
सन 2017 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने एकतर्फी जि.प.वर सत्ता मिळवली होती. 21 मार्च 2017 मध्ये जि. प. अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वप्नाली सावंत यांनी हाती घेतला होता. त्यानंतर लांजाच्या स्वरुपा साळवी यांची2018 मध्ये निवड झाली. 2020 ला आरक्षण सर्वसाधारण पडले. यानंतर अध्यक्षपदी देवरूखचे रोहन बने यांची निवड झाली. तर शेवटच्या टप्प्यात 2021 मध्ये राष्ट्रवादीचे विक्रांत जाधव हे अध्यक्ष झाले.