जि. प. अध्यक्षपदी जाधव की बने; आज फैसला 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद अध्यक्षपदासह सभापतींची नावे अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पाठविण्यात आली आहेत. आज टीआरपी येथे संपर्क प्रमुख सुधीर मोरे अध्यक्ष आणि सभापतींची नावे जाहीर करणार आहेत. अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव, उदय बने यांच्यात चुरस असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सुरु आहे.

शेवटच्या वर्षभरासाठी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहन बने यांच्यासह चार सभापतींनी राजीनामे दिल्यानंतर 22 मार्चला निवडणुक जाहीर झाली आहे. पदाधिकारी निवडीसाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांची उमेदवार निवडीसंदर्भात नुकतीच बैठक झाली. यामध्ये विषय समिती सभापतीपदावरील नावे जवळजवळ निश्‍चित झाली आहेत. तसेच अध्यक्षपदासाठी आलेल्या चार इच्छुकांपैकी दोन नावे निश्‍चित करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहेत.

अध्यक्षपदासाठी अण्णा कदम, बाळशेठ जाधव, विक्रांत जाधव आणि उदय बने अशी नावे चर्चेत होती; मात्र विक्रांत जाधव आणि उदय बने यांच्यात शेवटपर्यंत चुरस राहील अशी शक्यता शिवसेनेच्या वर्तुळात सुरु आहे. नव्या दमाच्या नेतृत्त्वाला संधी देणार की ज्येष्ठ आणि निष्ठावंताचा सन्मान करणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. उपाध्यक्षपदाचा उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडीवर अवलंबून राहणार आहे. तसेच विषय समिती सभापतीसाठी चंद्रकांत मणचेकर, परशुराम कदम, रेश्मा झगडे यांची नावे चर्चेत आहे. बांधकाम समिती सभापतीसह दोन पदे एका विधानसभा मतदारसंघात राहणार आहेत. तसेच उपाध्यक्षपदाची निवडणुक एप्रिल महिन्यात लागणार असली तरीही त्यासाठी एका ज्येष्ठ सदस्याच्या नावाचा विचार केला जात आहे.