लसीकरण पुन्हा सुरू; ना. सामंत यांचे प्रयत्न
रत्नागिरी:- कोल्हापूर येथून कोविशिल्डचे दहा हजार डोस रविवारी (ता. 25) रात्री जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे स्थगित केलेल्या लसीकरण मोहीमेला पुन्हा सुरवात झाली आहे. ही लस मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
पुरेशी लस मिळत नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेत खंड पडत आहे. शुक्रवारपर्यंतच पुरेल एवढा साठा उपलब्ध होता. त्याचा उपयोग दुसरा डोस घेणार्यांसाठी करण्यात आला. जिल्ह्यातील सत्तर टक्के केंद्रावर रविवारपर्यंत (ता. 25) लसीकरण थांबविण्यात आले होते. लस उपलब्ध असलेल्या 35 केंद्रांवर मोहीम सुरु ठेवण्यात आली. काल दिवसभरात 1 हजार 190 डोस देण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्याला 1 लाख 47 हजार डोस प्राप्त झाले होते. त्यातील 1 लाख 34 हजार डोसचे वितरण झाले आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे काही केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. ही माहिती प्रशासनाकडून वरीष्ठांकडे पोचवण्यात आली होती. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच दहा हजार कोविशिल्डचे डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. सोमवारी सकाळी जवळच्या केंद्रांवर त्याचे वितरण करुन लसीकरण मोहीम सुरु केली.