परशुराम घाटात कोसळली दरड; वाहतूक चिपळूण मार्गे वळवली
रत्नागिरी:- जिल्ह्यात काल रात्रीपासूनच अवकाळी पावसाचा सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासून रत्नागिरी शहर परिसरातही अवकाळीने हजेरी लावल्याने आंबा बागायदारांची चिंता वाढली आहे.
सोमवार व मंगळवारी काही भागांत पाऊस होईल; पण त्यानंतर राज्याचे तापमान ४ ते ५ अंशांनी वाढणार आहे. दरम्यान आज, उद्या रत्नागिरीसह सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे.
रविवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अंदमानसह बंगालच्या उपसागरातील बेटांवर जोरदार पाऊस सुरू झाला. दक्षिण किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. काल रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली. अवकाळीच्या आगमनाने सारे चिंतातुर झाले आहे. मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
परशुराम घाटात कोसळली दरड
पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली आहे. दरड खाली आल्याने वाहतूक विस्कळित झाली. मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहने घसरून पडत आहेत. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. जेसीबीच्या साहय्याने युद्धपातळीवर माती हटवण्याचे काम सुरु आहे.