जिल्ह्यात 7790 सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतांची होणार तपासणी

रत्नागिरी:- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, 01 एप्रिल ते 30 जून या कालावधीत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हयातील 846 ग्रामपंचायतीमधील 7790 सार्वजनिक स्त्रोत आहेत. दरवर्षी पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर स्त्रोतांची तपासणी करण्यात येते. सदरच्या सार्वजनिक स्त्रोतांच्या पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणीसाठी ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामसेवक यांच्यामार्फत सार्वजनिक स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा करण्यात येणार आहेत. व प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमुने नेमून दिलेल्या प्रयोगशाळेत विहीत कालावधीमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येतात. सदर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक घटकाच्या तपासणीमध्ये e-coliform (सुक्ष्मजीव), total coliform तर रासायनिक घटकांच्या तपासणीमध्ये प्रामुख्याने PH, Total Dissolved Solids, Fluoride, Nitrate, Iron इत्यादी घटकांची तपासणी करण्यात येते. जिल्हयामध्ये पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी 05 प्रयोगशाळा अस्तित्वात असून यामध्ये जिल्हयातील 7790 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येते. तरी या कालावधीमध्ये 846 ग्रामपंचायतींनी जैविक व रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुने वेळेत प्रयोगशाळेमध्ये पाठवावे असे आवाहन प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले आहे.