जिल्ह्यात 7 ते 21 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी:- महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) ( 3 ) अन्वये मनाई आदेश राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता दोन गटांचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले असून आगामी काळात जिल्ह्यांतील दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याची दाट शक्यता आहे. दिनांक 31/08/2022 ते दिनांक 09/09/2022 रोजी गणेशोत्सव सण साजरा करण्यात येत आहे . यादरम्यान मोठया प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार आहेत . त्यादरम्यान त्यांच्यातील जुने वादविवादावरून भांडणतंटा होऊन कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहाचण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू , सोलगाव , वरचीवाडी गोवळ , खालचीवाडी गोवळ व आजुबाजूच्या परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे.

या प्रकल्पास तेथील काही गावच्या स्थानिकांचा विरोध असून त्याअनुषंगाने मागील सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलने करून विरोध दर्शविण्यात येत आहे . त्याअनुषंगाने देखील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे . या पार्श्वभूमीवर सणाचे दरम्यान व इतर कालावधीत रत्नागिरी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता दि. 07/09/2022 रोजी 00.01 वाजले पासून ते दि . 21/09/2022 चे 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदाचे कलम 37 ( 1 ) ( 3 ) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश देण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) ( 3 ) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) ( 3 ) सन 1951 चा कायदा 22 वा नूसार 07/09/2022 चे 00.01 वाजले पासून ते दि . 21/09/2022 चे 24.00 वा . पर्यंत रत्नागिरी जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) ( 3 ) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे.