रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात 25 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. पुढे परतीचा पाऊसही ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत सुरु राहील. त्याचा परिणाम हळव्या भाताच्या कापणीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या अंदाजानुसार भात कापणीचे नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा गतवर्षीप्रमाणेच मुसळधार पावसात कापलेले भात वाया जाण्याची भिती बळीराजावर येऊ शकते.
कोकण कृषी विद्यापिठाकडून आलेल्या हवामान इशार्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी 19 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडले. पावसाचा जोर 25 सप्टेंबरपर्यंत कायम राहू शकतो. हळवी बियाणे 120 दिवसात तयार होतात. येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये ही भात कापणीयोग्य होऊ शकतात. सध्या हळवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गरवे आणि निमगरवे भात पिक पाटेरी व फुलोरा अवस्थेत आहे. भात खाचरात पाण्याची पातळी 5 ते 10 सेमी.पर्यंत ठेवणे गरजेचे आहे. हळव्या भात दुधाळ अवस्थेत असताना लोंबीवरील ढेकण्या किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. पावसाने उघडीप दिली तर लगेचच किड नियंत्रणासाठी औषध फवारणी केली पाहीजे. अंतिम टप्प्यात शेतकर्याला सातत्याने पाहणीवर भर द्यावा लागणार आहे. गतवर्षी काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामध्ये शेतकर्यांचे नुकसानही झाले होते. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. पावसावरच शेतकर्यांना नियोजन करावे लागेल. दोन वर्षांपुर्वी हळव्या भाताच्या कापणीच्या तोंडावर पावसाने सुरुवात केली. मुसळधार पावसामुळे कापलेली भात वाहून गेली, तर तयार भातं आडवी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे बारा हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले. यंदा तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी बळीराजाला पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.