जिल्ह्यात 24 तासात पुन्हा पाच रुग्णांचा मृत्यू

38 नवे पॉझिटिव्ह; मृत्युदर 3.68 टक्क्यांवर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोना बाधित पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 290 वर पोचली आहे. तसेच नव्याने 38 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 7 हजार 873 वर पोचली आहे. 
 

गुरुवारी आलेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यात 265 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. आता पर्यंत आलेल्या अहवालानुसार 41 हजार 438 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी तब्बल 109 जणांनी कोरोनावर मात केली. आता पर्यंत 6 हजार 950 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर 290 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

नव्याने आलेल्या अहवालानुसार 265 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पॉझिटिव्ह आलेल्या 38 रुग्णांमध्ये आरटिपीसीआर टेस्ट केलेले 25 तर अँटिजेन टेस्ट केलेल्या 13 रुग्णांचा समावेश आहे. यात रत्नागिरीत 13 रुग्ण, लांजा 2, देवरुख 7, राजापूर 1, कामथे 3, गुहागर 2, कळबनी 6 आणि दापोलीतील 3 रुग्णांचा समावेश आहे.