रत्नागिरी:- दरवर्षी उद्भवणारे पाण्याचे दुर्भिक्ष नष्ट करुन जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात. कच्चे बंधारे उभारण्यासाठी प्रत्येक गाव, वाडीमध्ये उभारण्याचे सूचित करताना आतापर्यंत 2338 बंधारे बांधले असून, श्रमदानामुळे सुमार दीड कोटींची बचत झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उद्भवणार्या पाणीटंचाईची तीव्रताही कमी होणार आहे.
प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवते. कारण, येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीबचतीचे नियोजन करण्यात येत आहे. उन्हाळ्यामध्ये उद्भवणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच प्रशासन तयारीला लागले आहे. यासाठी ‘मिशन बंधारे’ ची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये वनराई, कच्चे आणि विजय बंधारे उभारण्यात येत आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीला 10 बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे अधिकारी ग्रामस्थ, सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन श्रमदानाने बंधारे उभारले जात
आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2338 बंधारे उभारून पाणी अडवण्यात आले आहेत. त्यामध्ये 10 लाख कोटी लिटर पाणी साठणार आहे. हे बंधारे लोकसहभागातून केले जात असल्यामुळे शासनाचे 1 कोटी 50 लाख रुपयांची बचत झाली आहे. बंधार्यासाठी लागणार्या पिशव्यांचा खर्च येतो. बंधार्यासाठी श्रमदान केल्यामुळे मजुरीचा प्रश्न उद्भवत नाही. जिल्ह्यात बंधारे उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
ग्रामस्थांचा प्रतिसाद चांगला मिळत असून, प्रत्येक गावाला दिलेले लक्ष्य पूर्ण होईल. यामध्ये शासकीय यंत्रणांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. याचा फायदा पाणीटंचाई कालावधीत होणार आहे.
यानुसार आता पर्यंत मंडणगड तालुक्यात 106 बंधारे, दापोलीत 447, खेडमध्ये 147, चिपळूण तालुक्यात 220, गुहागरात 162 , संगमेश्वर तालुक्यात 468, रत्नागिरी तालुक्यात 103, लांजात 227 आणि राजापूर तालुक्यात 240 बंधार्यांची उभारणी करण्यात आली आहे.