जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा; रेड अलर्ट जाहीर

रत्नागिरी:- जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जाहीर केला आहे. सलग तिसर्‍या दिवशीही पावसाने जिल्ह्याला झोडपले. भारजा, जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, काजळीसह अर्जुना नद्या पात्र सोडून वाहत असल्याने किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरस्थिती नसल्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे. राजापूरातील पूर ओसरला असला तरीही पूराची टांगती तलवार कायम आहे.

जिल्ह्यात चोविस तासात सरासरी 130.26 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 215.10, दापोली 94.30, खेड 46.50, गुहागर 135.60, चिपळूण 102.50, संगमेश्वर 145, रत्नागिरी 162.90, राजापूर 128.70, लांजा 141.70 मिमी नोंद झाली. सवाधिक पावसाची नोंद झालेल्या मंडणगडात अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे किनारी भाग जलमय झाले आहेत. तेथील परिस्थिती आटोक्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे राजापूर शहरातील पूरस्थिती नियंत्रणात आली; मात्र मंगळवारी दिवसभर संततधार सुरु होती. मोठ्या नुकसानीची नोंद झाली नसली तरीही घरांची पडझड सुरु होती. पुराचे पाणी ओसरल्याने संपर्क तुटलेल्या राजापूर, मंडणगड, खेड तालुक्यातील गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. नद्या पात्र सोडून वाहत असल्यामुळे पुन्हा कधीही पूर येईल अशी स्थिती होती. रत्नगिरी तालुक्यात दुपारपर्यंत पाऊस सुरु होता. सायंकाळी विश्रांती घेतली. काजळी नदीची पाणी पातळी धोक्याच्या इशार्‍यापर्यंत स्थिरावली आहे. चिपळूण, खेडमध्येही अनुक्रमे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांचे पाणी इशारा पातळीपर्यंत आले आहे.

पावसामुळे मंडणगड तालुक्यात अडखळ येथील बंडू यशवंत हिलम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 47 हजार 900 रुपयांचे, दापोली भडवळेतील ओंकार रामचंद्र खरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 25 हजार रुपयांचे, चिपळूण कापसाळ येथील सुरेखा सुरेश साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 6 हजार रुपयांचे नुकसान झाले. गुहागर पडवे येथे तिन गुरांचे 1 लाख 50 हजारांचे नुकसान. संगमेश्वर कोळंबेतील बंडू लिंगायत यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: 30 हजार रुपये, पाटगाव येथील रामचंद्र सोनू पागार यांच्या विहिरीचे 40 हजाराचे नुकसान झाले. राजापूर तळवडेतील बाबाजी गोरे यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अंशत: नुकसान झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पावसाचा जोर अजून तीन दिवस कायम राहील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकिनारी भागातील लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.